कोल्हापूर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल; शहराध्यक्षपदी प्रवीण केसरकर, जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील कायम

<p>कोल्हापूर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल; शहराध्यक्षपदी प्रवीण केसरकर, जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील कायम</p>

कोल्हापूर - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संघटनात्मक बदलाचे संकेत दिल्यानंतर राज्यभरात पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या महिनाभरात काँग्रेसच्या निरीक्षकांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. या दौऱ्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या गेल्या. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेनंतर आज काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

त्यामध्ये कोल्हापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. तर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे.

यापूर्वी शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून सचिन चव्हाण हे काम पाहत होते. आता प्रवीण केसरकर यांच्या निवडीमुळे शहर संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्ष संघटन बळकटीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या बदलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न या नियुक्त्यांमधून दिसून येत आहे.