अनधिकृत लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; तीन ट्रॅक्टरसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर - वनविभाग कोल्हापूर अंतर्गत प्रादेशिक वन परिक्षेत्र करवीर येथील सांगरूळ बीटच्या वनविभागाने अनधिकृत जांभूळ, आंबा व फणसाच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर धडक कारवाई केली. या कारवाईत तीन ट्रॅक्टरसह सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनविभागाच्या पथकाने संशयित ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत लाकूड आढळून आले. यावेळी तीनपैकी एका ट्रॅक्टर ट्रॉलीतील जांभळाच्या झाडाचे लाकूड रस्त्यावर पलटी करून चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वनाधिकारी वेदश तांबोरे यांनी तत्परता दाखवत संबंधितांना पकडले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.