गोकुळमध्ये आमदार सतेज पाटील यांची विरोधकांना धास्ती
कोल्हापूर - शहराच्या सहकार राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक यंदा केवळ एका संस्थेची निवडणूक राहिलेली नाही. ती आता महायुतीच्या ताकदीची, संघटनात्मक एकजुटीची आणि ग्रामीण भागातील जनाधाराची परीक्षा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गोकुळची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे महायुतीतील अंतर्गत मतभेद, नाराज नेत्यांचे समर्थक, ठरावधारकांचे गणित आणि सर्वपक्षीय एकजुटीचा दावा करणाऱ्या विरोधकांची रणनीती यामुळे लढत अधिकच रंगतदार होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांची वाढती राजकीय सक्रियता आणि महायुतीतील वाढती अंतर्गत नाराजी यामुळे निवडणुकीची समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.
महायुतीतील मित्रपक्षांचे आमदार नाराज? ...
गोकुळच्या राजकारणात महायुतीतील प्रमुख चेहरे असलेले आमदार राजेंद्र यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार शिवाजी पाटील यांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत असून त्याचा थेट परिणाम मतदानावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गोकुळमधील ठरावधारक संस्थांच्या गणितात या तिन्ही नेत्यांचा प्रभाव किती आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीतील अंतिम निकालावर हेच गणित निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे.
मंत्री हसन मुश्रीफ – आमदार शिवाजी पाटील संघर्ष पुन्हा चर्चेत....
महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे बोलले जाते. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक टीकेमागे शिवाजी पाटील समर्थकांची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संघर्षाचे पडसाद सभासद शेतकऱ्यांच्या मतदानातून उमटणार, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. निकालातून या संघर्षाची खरी ताकद समोर येईल, असे अनेक सभासदांचे मत आहे.
माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील गटाचा असंतोष महागात पडणार?...
माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या प्रभावाखालील संस्था आणि कार्यकर्ते आजही मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. शिवाजी पाटील हे सर्व संस्था आपल्याच असल्याचे मानत असले तरी गत जिल्हा परिषद निवडणुकीतील काही घटनांनी या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे. भरमूअण्णा पाटील यांच्या सुनेचा म्हणजे ज्योती दीपक पाटील यांचा झालेला पराभव अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्या पराभवामागे आमदार शिवाजी पाटील यांची राजकीय रणनीती असल्याचा संदेश काही कार्यकर्त्यांमध्ये अजूनही कायम असल्याचे बोलले जाते. त्यामुळे निर्माण झालेला असंतोष गोकुळ निवडणुकीत उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवाजी पाटील यांच्या प्रभावाखाली नेमक्या किती ठरावधारक संस्था उभ्या राहणार, हा निवडणुकीतील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.
आमदार सतेज पाटील यांची रणनीती चर्चेत....
आमदार सतेज पाटील यांची निवडणुकीतील रणनीती राज्यभर चर्चेचा विषय असते. यावेळीही त्यांनी "पक्ष नव्हे, शेतकरी आणि सहकार" हा मुद्दा पुढे करत सर्वपक्षीयांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विचाराने एकत्र येणाऱ्या सर्व घटकांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढविण्याची त्यांची भूमिका अनेकांना आकर्षित करताना दिसत आहे. आमदार सतेज पाटील यांची टीम जिल्हाभर सक्रिय झाली असून महायुतीविरोधी वातावरण तयार करण्यात ती सध्या यशस्वी ठरत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
कोल्हापूरच्या सहकारात पक्षापेक्षा गट-तट महत्त्वाचे...
कोल्हापूरच्या सहकार चळवळीचा इतिहास पाहिला तर येथे पक्षीय राजकारणापेक्षा गट-तटांचे राजकारण अधिक प्रभावी राहिले आहे. गोकुळ, केडीसीसी बँक आणि इतर प्रमुख संस्थांमध्ये आजही सर्वपक्षीय संचालक एकत्र काम करताना दिसतात. अशा परिस्थितीत गोकुळची निवडणूक पूर्णपणे पक्षीय रंगात रंगविण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महागाईच्या काळात महायुतीला सभासदांची साथ?...
महागाई, शेतीमालाचे दर, उत्पादन खर्च आणि ग्रामीण भागातील नाराजी ही महायुतीसमोरील मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत गोकुळचे सभासद भाजप आणि महायुतीच्या बाजूने ठामपणे उभे राहतील का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाला शेतकरी मान्यता देणार?..
कोल्हापूरच्या सहकार इतिहासात गोकुळ, केडीसीसी बँक किंवा इतर महत्त्वाच्या संस्थांमध्ये कोणत्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप सहसा मान्य केला गेला नाही. सत्ता कोणाचीही असो, या संस्था स्थानिक नेतृत्वाच्या बळावरच चालत आल्या आहेत. त्यामुळे गोकुळ निवडणुकीत राज्य पातळीवरील हस्तक्षेप वाढल्याची भावना निर्माण झाल्यास शेतकरी आणि सभासद त्याला कितपत स्वीकारतील, हा खरा प्रश्न आहे. सहकारातील स्वायत्तता जपायची की पक्षीय राजकारणाला संधी द्यायची, याचा निर्णय सभासदांना घ्यावा लागणार आहे.
गोकुळमध्ये पक्षीय लढा की सर्वपक्षीय सहकार?..
कोल्हापूरच्या सहकार इतिहासात गोकुळ, केडीसीसी बँक किंवा इतर महत्त्वाच्या संस्थांमध्ये कोणत्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप मान्य केला गेला नाही. सत्ता कोणाचीही असो, सहकारी संस्था या स्थानिक नेतृत्वाच्या बळावरच चालल्या आहेत. दरम्यान, गुजरातचा अमूल ब्रँड हा भाजप पक्षाच्या जवळचा मानला जातो. मग गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला साथ दिली तर भविष्यात गोकुळचे अस्तित्व मिटवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हा संदेशही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पसरलेला दिसून येतो. म्हणूनच गोकुळ निवडणुकीत राज्य पातळीवरील हस्तक्षेप वाढल्याची भावना निर्माण झाल्यास शेतकरी आणि सभासद त्याला कितपत स्वीकारतील, हा खरा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यात सहकार क्षेत्रात निर्माण झालेल्या समीकरणाला धक्का देण्याचा महायुतीचा प्रयत्न यशस्वी होणार का, की अंतर्गत नाराजीमुळे महायुतीचाच गड ढासळणार? याचे उत्तर गोकुळच्या निकालातून मिळणार आहे. हा निकाल केवळ दूध संघाचा नसेल, तर कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचा पुढचा राजकीय मार्गही निश्चित करणारा ठरणार आहे.