एमआरपीच्या नावावर होणारी ग्राहकांची आर्थिक लूट थांबवा : ग्राहक पंचायतीची मागणी
कोल्हापूर - वस्तूच्या छापील किमतींच्या नावाखाली सर्वत्र उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांचे आर्थिक शोषण होत आहे. हे शोषण थांबवण्यासाठी ग्राहकांना उत्पादन खर्चाची माहिती मिळावी, यासाठी एमआयरपी कायद्यात बदल करुन वस्तूवर उत्पादन खर्च छापणे बंधनकारक करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी आज देशभर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर महानगरच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. वस्तूच्या प्रत्येक पाकीटावर त्या वस्तूचे उत्पादन मूल्य छापणे सक्तीचे करावे, उत्पादित मालाच्या पाकिटावर प्रथम विक्री किंमत स्पष्टपणे नमूद करणे कायदेशीर करावे, एमआरपी ठरवण्यासाठी वाजवी कमाल मर्यादा निश्चित करणारा स्वतंत्र कायदा करण्यात यावा, एमआरपी संदर्भातील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे, औषधी आणि जीवनावश्यक वस्तूंवर नफ्याची मर्यादा सरकारने निश्चित करावी,अशा मागण्या ग्राहक पंचायतीच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
यावेळी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेवून घोषणाबाजी केली. या आंदोलनात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री संदीप जंगम, प्रांत सदस्य प्रसाद बुरांडे, प्रांत सदस्या अॅडव्होकेट सुप्रिया दळवी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव विठ्ठल चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य रामदास चव्हाण, रवींद्र घाटगे, योगेश तिवले, रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर महानगर अध्यक्ष विनायक वाळवेकर, सुहास गुरव, कमलाकर बुरांडे, शिवनाथ बियाणी, कोषाध्यक्ष सुरज कुलकर्णी, किशोर खेडेकर, शिवाजी आडोले, राजेश शंभूशेटे उपस्थित होते.