गांधीनगरातील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर महापालिकेची निष्कासन मोहीम सुरू

<p>गांधीनगरातील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर महापालिकेची निष्कासन मोहीम सुरू</p>

कोल्हापूर : गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेने आज (ता. २२) सकाळी सात वाजल्यापासून निष्कासन मोहिमेला सुरुवात केली. या कारवाईसाठी महापालिकेची तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून आवश्यक यंत्रसामग्रीसह अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

गांधीनगरपर्यंतचा परिसर कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतच येत असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गांधीनगरमधील २०४ मिळकतधारकांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे नोंदविण्यात आले तसेच सुनावण्या घेण्यात आल्या. सुनावणीनंतर संबंधितांना निष्कासनाच्या नोटिसाही देण्यात आल्या होत्या.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी अलीकडेच गांधीनगर परिसरातील विनापरवाना मिळकतींची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी विनापरवाना बांधकाम व व्यवसाय करणाऱ्या मालकांना दुकानांतील साहित्य तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज सकाळपासून इमारती, टपऱ्या, खोकी तसेच विनापरवाना उभारण्यात आलेली विविध व्यावसायिक बांधकामे हटविण्याचे काम सुरू आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, एकूण २०४ प्रकरणांपैकी १७७ प्रकरणांमध्ये न्यायालयाची स्थगिती असून ती २५ जूनपर्यंत लागू आहे. उर्वरित २७ प्रकरणांपैकी स्थगिती नसलेल्या निवासी बांधकामांना वगळून व्यावसायिक मिळकतींवर कारवाई करण्यात येत आहे.

मोहिमेत एक पोकलँड, तीन जेसीबी, तीन डंपर, तीन गॅस कटर-वेल्डर संच तसेच तीन अतिक्रमण डंपर यांसह आवश्यक यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान विद्युत, पाणीपुरवठा, वर्कशॉप, इस्टेट, अतिक्रमण, घरफाळा, नगररचना आणि विधी विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

रविवारी सरस्वती साडी डेपो परिसरातील खुल्या जागेत विनापरवाना उभारण्यात आलेले तीन होर्डिंग्ज महापालिकेने निष्कासित करून जप्त केले होते. ही कारवाई एक जेसीबी व दोन डंपरच्या सहाय्याने करण्यात आली होती.

कारवाईसाठी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गवळी, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील, प्रमोद बराले, चेतन आरमाळ, इस्टेट ऑफिसर शेखर साळोंखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विद्युत अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, सर्व्हेअर दत्ता पारधी व खुशालचंद राजमाने उपस्थित आहेत.