कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कामकाजाचा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा…
कोल्हापूर - आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी नुकताच कोल्हापूर शहरातील स्वच्छता, कचरा उठाव आणि क्यूआर कोड स्कॅनिंगच्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीत टिप्परद्वारे कचरा उठावानंतर करण्यात येणाऱ्या क्यूआर कोड स्कॅनिंगची तपासणी करण्यात आली. काही आरोग्य निरीक्षकांनी स्कॅनिंग कमी होण्यामागे तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले. यावर आयुक्तांनी तांत्रिक अडचणी आहेत की हलगर्जीपणा होतोय याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. चांगले काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांचा सत्कार करण्याच्या सूचना देत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले. पुढील बैठकीत आरोग्य निरीक्षकांनी दैनंदिन कामांचे पीपीटीद्वारे सादरीकरण करावे असेही आयुक्तांनी सूचित केले. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिकांची विशेष पथके तयार करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
या बैठकीला उपआयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.