संजय गांधी निराधार योजनेच्या ३४५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप...
कोल्हापूर - कागलमधील बहुउद्देशीय कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ३४५ लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी, संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याचे गौरवोद्गार काढले आहेत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे राज्यात सर्वाधिक लाभार्थी कागल तालुक्यातील असल्याचे सांगितले. या योजनेसाठी उत्पन्नाची अट २१ हजारांवरून ५० हजार रुपये करण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी, आपण मंत्रिमंडळात काम करताना प्रत्येक निर्णयामध्ये गरीब आणि सामान्य माणसाच्या हिताकडे लक्ष दिले आहे. दिव्यांगांची पेन्शन १५०० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आली असून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन २००० रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी उत्पन्नाची अट ५० हजार रुपये करणे आणि वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, युवराज पाटील, जनार्दन पाटील, बाबासो सांगले, भूषण पाटील, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, प्रवीण भोसले, अस्लम मुजावर, नवाज मुश्रीफ, संजय चितारी, अरुण गुरव, नवल बोते यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते.