‘एजंटगिरी आणि सेटलमेंट’ केल्याचा विधी विभागप्रमुख संदीप तायडे यांच्यावर गंभीर आरोप

<p>‘एजंटगिरी आणि सेटलमेंट’ केल्याचा विधी विभागप्रमुख संदीप तायडे यांच्यावर गंभीर आरोप</p>

कोल्हापूर : केंद्राच्या निधीतून कर्जफेडीसाठी रक्कम वळवल्याच्या मुद्द्यावरून आधीच तापलेल्या महापालिका सभेत आता ‘एजंटगिरी आणि सेटलमेंट’च्या आरोपांची भर पडल्याने वातावरण आणखी ढवळून निघाले आहे. विधी विभागप्रमुख संदीप तायडे यांच्यावर नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे सभागृहात खळबळ उडाली.

केंद्र सरकारच्या १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातून प्राप्त निधीतील काही रक्कम कर्जासाठी वर्ग केल्याचे उघड झाल्यानंतर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. “हा निधी शहराच्या विकासासाठी की कर्जफेडीसाठी?” असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी संबंधित निधी कोणत्या प्रकल्पासाठी वापरणार आणि त्याची सद्यस्थिती काय आहे, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली. यावर मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी हा निधी अमृत योजना-२ व रस्ते प्रकल्पासाठी असल्याचे सांगितले. मात्र, काही रक्कम शिंगणापूर योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कर्जफेडीसाठी वळवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे नगरसेवकांचा संताप वाढला. सुनील मोदी यांनी अर्थसंकल्पात याचा उल्लेख का नव्हता, असा प्रश्न उपस्थित केला, तर प्रा. जयंत पाटील यांनी जीवन प्राधिकरणाच्या कर्जाची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यामागचे कारण विचारले.

दरम्यान, सभागृहातील चर्चेला वेगळे वळण देत नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी आरक्षण मुद्द्यावरून विधी विभागप्रमुख संदीप तायडे यांच्यावर थेट आरोप केले. “एजंटगिरी आणि सेटलमेंट करून महापालिकेच्या विरोधी बाजूला समर्थन दिले जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

एकूणच, निधी वळवण्याच्या मुद्द्यासोबतच प्रशासनावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे कोल्हापूर महापालिकेतील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.