सत्तेचे स्वप्न भंगल्याने भाजपकडून रुदालीचे काम सुरूय : आ. रोहित पवारांचा आरोप
मुंबई - लोकसभेत २०२३ मध्येच महिला विधेयक मंजूर झाले होते. मग आता २०२९ ची निवडणूक भाजपला जिंकायची आहे त्यासाठी हा सर्व परिसीमनाचा खटाटोप सुरु होता. पण भाजपच्या सत्तेचे स्वप्न सध्या भंगल्याने भाजपने रुदालीचे काम सुरू केलं असल्याचा आरोप आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी त्यांनी आसाम, जम्मू काश्मीर आणि पिपरी चिंचवड येथील मतदार संघातील प्रकार सांगून कशाप्रकारे भाजप आपल्या मनाप्रमाणे मतदार संघाची मोडतोड करत आहे हे दाखवून दिले.
यावेळी त्यांनी वस्तुस्थिती मांडताना सांगितले कि, हे महिला आरक्षण बिल नव्हे तर परिसीमनाचे बिल होते. महिला आरक्षण हे 2023 पूर्वीच मंजूर केले गेले होते परंतु केवळ महिला आरक्षणाच्या मुखवट्याखाली परिसीमन करून खासदारांची संख्या वाढवण्याचा हा डाव होता. ज्या राज्यांनी लोकसंख्या वाढीला नियंत्रित केलं त्या राज्यांमध्ये खासदारांची संख्या कमी तर ज्या राज्यांची लोकसंख्या बेफान वाढली तिथे खासदारांची संख्या अधिक हे कितपत योग्य असा, सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना बक्षीस देण्याऐवजी शिक्षा देण्याचा हा प्रकार नाही काय ?, महिला आरक्षण विधेयकाच्या आडून २०२९ मध्ये सत्तेची पोळी भाजण्याचा भाजपचा डाव लक्षात आल्याने विरोधकांनी तो एकत्रितपणे हाणून पाडला आहे.