इचलकरंजीतील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई सुरू...
इचलकरंजी - शहरात रस्त्याच्या दुतर्फा चहा, फळ विक्रेते दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यानुसार आज सकाळपासून अतिक्रमण निर्मूलन मोहिम सुरू करण्यात आली. राजवाडा चौक ते महात्मा गांधी पुतळा ते शिवतीर्थ ते छत्रपती शाहू पुतळा, एएससी कॉलेज ते कोल्हापूर नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर असणारे अतिक्रमण या मोहिमेत काढण्यात आले. काही ठिकाणी अतिक्रमण काढताना वादावादी झाली. नारायण टॉकीजवळ अतिक्रमण काढत असताना काही अतिक्रमणधारकांनी विरोध केला. यावेळी वादावादीचा प्रकार घडला. मात्र, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही न जुमानता अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरूच ठेवली आहे. काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. ही मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे महापौर उदय धातुंडे यांनी सांगितले आहे.