लकी ग्रुपच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर; 110 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 110 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. लकी ग्रुपचे चेअरमन आश्विन बडे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला कामगार व सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत मदत मिळावी आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लकी ग्रुपच्या कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराचे उद्घाटन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील आणि कम्युनिटी पोर्टफोलिओचे माजी उपसंचालक डी. ए. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे आभार मानण्यात आले.
यावेळी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे कार्यवाह डॉ. अर्जुन अडनाईक, कम्युनिटी पोर्टफोलिओच्या सदस्या डॉ. आशा शितोळे, डॉ. अश्विनी पाटील, संजीवनी ब्लड बँकेचे कर्मचारी तसेच लकी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.