राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोल्हापूर - महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने गेल्या १३ वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आयोजित उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शहरातील विविध भागांतील लाभार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वाढदिवसांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी वापरावा, असा संदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्याच विचारांचा वारसा जपत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने चौदाव्या वर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला.
यामध्ये सुमारे १५०० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना मदतीचा हात मिळाला असून विद्यार्थ्यांनाही नव्या शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यावेळी राजू जाधव, अतुल भालकर, प्रविण माने, प्रसाद जाधव, गणेश बुचडे, अद्वैत जाधव, बबन सावरे, किरण बेडेकर, राज मकानदार, संजय जाधव, किरण पोतदार, खानविलकर, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, आदिराज माने, राजीव थोरवडे, अल्ताफ बारस्कर, समीर बागवान, प्रकाश तौर, योगेश कवाळे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.