सोन्याच्या कळसाने झळाळले श्री अंबाबाई मंदिराचे शिखर
कोल्हापूर - करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर भक्ताने अर्पण केलेला दीड किलो वजनाचा सोन्याचा कळस यशस्वीपणे बसविण्यात आला असून, त्यामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कामामुळे मंदिराचे शिखर नव्या तेजाने झळाळून निघाले आहे.
मंदिराच्या शिखरावर कळस बसविण्याचे काम गुरुवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने सुमारे २०० किलो वजनाचे तांब्याचे आवरण तसेच अन्य साहित्य शिखरापर्यंत पोहोचविण्यात आले. त्यानंतर कारागिरांनी अत्यंत काळजीपूर्वक मुख्य कामाला सुरुवात केली.
मंदिराचे शिखर सुमारे सहा फूट उंच असून त्यावरील गोलाकार डेरा आकर्षक रचनेचा आहे. या वास्तुरचनेला कोणतीही बाधा न आणता कळस बसविण्याचे मोठे आव्हान कारागिरांसमोर होते. मात्र नियोजनबद्ध पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात आले.
मंगलोर येथील कुशल कारागिरांनी दीड किलो सोन्याचा हा कळस तयार केला. गुरुवारी सायंकाळी कळस मंदिरात दाखल झाल्यानंतर त्याची पूजाविधीपूर्वक स्थापना करण्यात आली. रात्री उशिरा कळस आणि त्याभोवतीचे तांब्याचे आवरण शिखरावर चढविण्याची प्रक्रिया सुरू झाली.
पावसाचे पाणी शिखरात झिरपू नये यासाठी गोलाकार डेऱ्याभोवती सुमारे २०० किलो वजनाचे तांब्याचे संरक्षणात्मक आवरण बसविण्यात आले आहे. यामुळे शिखराचे संरक्षण होण्याबरोबरच त्याचे सौंदर्यही अधिक खुलून आले आहे.मंदिर प्रशासनाचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे वीस कर्मचाऱ्यांचे पथक आणि कारागीर या कामात सहभागी झाले होते. कळस स्थापनेमुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.