डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या दोन विद्यार्थ्यांची गूगल स्टूडेंट अँबेसिडर म्हणून निवड
कोल्हापूर - तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी तेजस चौगुले आणि अतीफ पन्हाळकर यांची गूगल स्टूडेंट अँबेसिडर म्हणून निवड झाली आहे. संस्थेचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश आर. पावसकर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.
ही निवड विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य, नाविन्यपूर्ण विचारसरणी, नेतृत्वगुण तसेच डिजिटल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन करण्यात आली आहे. गूगल स्टूडेंट अँबेसिडर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, नवोपक्रम, नेतृत्व आणि जागतिक स्तरावरील तांत्रिक समुदायाशी जोडण्याची संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक उपक्रम, प्रोजेक्ट्स, कार्यशाळा आणि सामाजिक माध्यमांद्वारे तंत्रज्ञान प्रसाराचे केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि संस्थेच्या प्रोत्साहनामुळे बहुमान प्राप्त झाला आहे.
या विद्यार्थांना संचालक डॉ. सतीश आर. पावसकर, डीन अकॅडेमिक्स प्रा. राजेंद्र एस. पवार, आयक्यूएसी समन्वयक प्रा. केदार सहस्रबुद्धे, असिस्टंट रजिस्ट्रार जे. ए. पवार यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.