‘या’ मालिकेच्या बंदवरून वाद पेटला : एवढी लाचार चित्रपटसृष्टी मी पाहिली नाही : आ. जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल
आ. जितेंद्र आव्हाडांकडून मालिकेसाठी 10 लाखांची मदत
मुंबई – देशातील पहिली महिला शिक्षिका तसेच देशात स्त्री शिक्षणाची गंगा सुरु करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित 'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' ही मालिका सुरु आहे. ही मालिका कमी टीआरपी आणि आर्थिक चणचणीमुळे बंद होत असल्याचे वाहिनीकडून सांगण्यात येत आहे. परंतु या बंदला विरोध होत असून या मालिकेवरून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून त्यांनी मालिका बंदला विरोध केला आहे. यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, असे प्रसंग येतात तेव्हा नाना पाटेकर असतात कुठे? 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका बंद पडल्यावर नाना पाटेकरांनी बोलायला पाहिजे ना, अनासपुरेंनी बोलायला पाहिजे, त्या आमच्या प्राजक्ता माळी ताई आहे, त्यांनी बोलायला पाहिजे होते, असे त्यांनी कलाकारांना सुनावले आहे.
सर्वसामान्य जनता आणि चित्रपटसृष्टीचा जवळचा संबंध असतो. पण आजची चित्रपटसृष्टी म्हणजे 'आम चुस के खाया या काट के खाया', अशी अवस्था आहे. एवढी लाचार चित्रपटसृष्टी मी पाहिली नाही. मला मनोरंजनसृष्टीतील कोणाकडूनही अपेक्षा नाही. फक्त मागे दीपिका पदुकोण बोलली तिची अवस्था काय झाली ते आपल्याला माहिती आहे. पण तिने बोलण्याचं धारिष्ट्य तरी दाखवलं होतं, असे ते म्हणाले आहेत. यावेळी आ.जितेंद्र आव्हाड यांनी मालिकेसाठी खा.अमोल कोल्हे यांना 10 लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.