माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा - राज ठाकरेंचे ट्वीट

<p>माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा - राज ठाकरेंचे ट्वीट</p>

मुंबई – येत्या १४ जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांनी ट्वीटवरून मनसैनिकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी वाढदिवसानिमित्त झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्याचे  आवाहन सर्वांना केले आहे. 
त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, १४ जून या माझ्या वाढदिवसा दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता. वाढदिवसा दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे. यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांच्या  आणि फुलांच्या झाडांना उन  लागतं  त्यामुळे त्यांना उन  आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.