कोल्हापुरात मनोज जरांगे पाटील यांचा दौरा; नवीन राजवाड्यात बैठक व पत्रकार परिषद
कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे रविवार, दि. 14 जून 2026 रोजी सोलापूरहून कोल्हापूर येथे मुक्कामासाठी येणार आहेत. त्यानंतर सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी ते दिवसभर कोल्हापूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
दौऱ्यादरम्यान सकाळी ते श्री अंबाबाई मंदिर येथे दर्शन घेणार असून त्यानंतर सकाळी 10.30 वाजता नवीन राजवाडा येथे पोहोचणार आहेत. येथे ते खासदार श्रीमंत शाहू महाराजांची सदिच्छा भेट घेतील. यानंतर कोल्हापूर गॅझेटियर विषयावर प्रमुख मराठा कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीत ऐतिहासिक व सामाजिक संदर्भातील विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येणार असल्याची माहिती प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी दिली आहे.
दरम्यान, बैठकीनंतर नवा राजवाडा येथेच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मनोज जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधून विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या दौऱ्यामुळे मराठा समाजातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.