मराठा संघर्ष योद्धा उद्या कोल्हापुरात...
कोल्हापूर - मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील हे उद्या रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. उद्या सायंकाळी छत्रपती ताराराणी चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागत सोहळ्यासाठी स्वयंसेवकांची विविध पथके कार्यरत असून कायदा आणि सुव्यवस्था राखत शांततेच्या मार्गाने कार्यक्रम पार पाडण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.
दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरांयाच्या पुतळ्याला अभिवादन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेणार आहेत.
सकाळी साडेदहा वाजता एका महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहून जरांगे पाटील खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सोबत चर्चा करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील मराठा समाजबांधवांमध्ये या दौऱ्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाभरातील मराठा बांधव, भगिनी, युवक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार बैठकीला कोल्हापूरचे समन्वयक प्रविण पाटील, राहुल इंगवले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.