जिल्हाधिकाऱ्यांकडे पेठवडगाव, कुरुंदवाड नगरसेवकांची धाव; विकासकामे, प्रशासनातील अनियमितता आणि पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा

<p>जिल्हाधिकाऱ्यांकडे पेठवडगाव, कुरुंदवाड नगरसेवकांची धाव; विकासकामे, प्रशासनातील अनियमितता आणि पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा</p>

कोल्हापूर : पेठवडगाव आणि कुरुंदवाड नगरपालिकांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेत विविध मागण्या आणि तक्रारींचे निवेदन सादर केले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्य, विकासकामे, प्रशासनातील पारदर्शकता, निविदा प्रक्रिया तसेच पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह विविध विषयांवर चर्चा झाली.

सुरवातीला पेठवडगाव नगरपालिकेतील यादव पॅनेल आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर शहरातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्न मांडले. बळवंतराव हॉस्पिटलची जागा पूर्णपणे नगरपालिकेच्या नावावर हस्तांतरित करावी, तसेच हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. सर्पदंश आणि श्वानदंशावरील लसींचा तुटवडा दूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेकडील बंद अवस्थेतील पशुवैद्यकीय दवाखान्याची जागा नगरपालिकेकडे वर्ग करून त्या ठिकाणी मत्स्य मार्केट सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. तांबे वसाहतीतील केदारलिंग मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र राठोड यांनी पेठवडगावचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांना त्याबाबत सूचना करून प्रस्ताव पाठवण्यास सांगितलं. बैठकीस उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, नगरसेवक अभिजीत गायकवाड, विशाल वडगावे, निवास धनवडे, शितल कोळी, माजी नगराध्यक्ष अभिजित पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच कुरुंदवाडमधील काँग्रेसचे गटनेते प्रदीप चव्हाण, तानाजी आलासे, दीपक परीट, महावीर पाटील, शब्बीर बागवान, अमोल जाधव, पप्पू पाटील, राजू आवळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर कुरुंदवाड नगरपरिषदेतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रशासनातील विविध अनियमिततेबाबत तक्रारी मांडल्या. नगरपरिषदेच्या सभांचे इतिवृत्त आणि रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच गौण खनिज चोरीच्या तक्रारींवर कारवाई न होणे, निविदा प्रक्रिया न राबवता कचरा विक्री, काही कंत्राटदारांची देयके प्रलंबित ठेवणे आणि सुधारित पाणीपुरवठा योजना रखडवून ठेवणे यासह अनेक विषय उपस्थित करण्यात आले. माहिती अधिकार कायद्याच्या विरोधातील आदेश, नियमबाह्य निविदा मंजुरी आणि प्रशासनातील दिरंगाईबाबतही जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या पाच सभा होऊनही त्यांचे अधिकृत इतिवृत्त अद्याप प्रसिद्ध करण्यात आले नसल्याची तक्रार करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कायद्यानुसार काम करण्याच्या आणि तातडीने इतिवृत्त उपलब्ध करून देण्याच्या मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांना सूचना दिल्या. बैठकीस बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, काँग्रेसचे गटनेते प्रदीप चव्हाण, तानाजी आलासे, दीपक परीट, महावीर पाटील, शब्बीर बागवान, अमोल जाधव, माजी नगरसेवक पप्पू पाटील, राजू आवळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आंबेवाडी ग्रामस्थांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सोनतळी या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी राखीव असलेले ९५ प्लॉट पात्र कुटुंबांच्या नावावर तात्काळ वर्ग करण्याची मागणी केली. २०२२ मध्ये करण्यात आलेल्या पडताळणीत उपलब्ध असलेले अनेक प्लॉट आता कमी झाल्याचा दावा करत उर्वरित जागांवर अतिक्रमण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अतिक्रमण होण्यापूर्वी पात्र लाभार्थ्यांना भूखंडांचे वाटप करावे, अशी मागणी माजी सरपंच एम. जे. पाटील यांनी केली.

पेठवडगाव, कुरुंदवाड आणि आंबेवाडी येथील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर थेट मांडणी करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी देखील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासमोर संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर काम करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.