बालिंगा सब स्टेशन दुरुस्तीमुळे सोमवारी पाणीपुरवठा बंद

<p>बालिंगा सब स्टेशन दुरुस्तीमुळे सोमवारी पाणीपुरवठा बंद</p>

कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सोमवारी 18 मे 2026 रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी संबंधित भागातील विद्युत पुरवठा बंद राहणार असून, परिणामी बालिंगा पंपिंगवर अवलंबून असलेल्या कोल्हापूर शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 18 मे रोजी संबंधित भागातील दैनंदिन पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच मंगळवारी 19 मे रोजी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

या बंदचा परिणाम ए, बी, सी व डी वॉर्डसह संबंधित उपनगरे आणि ग्रामीण भागांवर होणार आहे. यामध्ये लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, आपटेनगर, शिवाजीपेठ, महाद्वार रोड, गंगावेश, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी आदी भागांचा समावेश आहे.

तरी नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.