वाढत्या महागाईविरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अनोखे आंदोलन
कोल्हापूर - देशात वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शिवेसना ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविरोधात अनोखे विडंबनात्मक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात एक बैलजोडी उभी करून त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यंगचित्राचा मुखवटा लावण्यात आला होता. या शेजारी शिवसैनिक विविध उपरोधिक संदेश असलेले फलक घेऊन उभे होते. सोने खरेदी करू नका, लोखंड खरेदी करा, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे अभिनंदन, विवाह, मुंज, वास्तुशांती टाळा अशा आशयाचे संदेश या फलकांवर होते. यावेळी शिवसेनेकडून एक विडंबनात्मक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये नागरिकांनी काटकसर करण्यासाठी लग्न, बारसे, स्वागत समारंभ, मुंज आणि वास्तुशांतीसारख्या कार्यक्रमांवर खर्च करू नये, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन न करता उलट मोदींचे स्वागत करावे, असा उपहासात्मक उल्लेख करण्यात आला होता. सोन्या-चांदीच्या दुकानांना कुलूप लावावे, पेट्रोल पंपावर अर्ध्या लिटरपेक्षा अधिक पेट्रोल देऊ नये आणि सोने खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा प्रकारच्या उपरोधिक मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या. भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, गॅस आणि सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात होते. मात्र, अच्छे दिनाच्या घोषणा देणाऱ्या सरकारने आता नागरिकांसमोर महागाईचे संकट उभे केले आहे, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या आंदोलनात शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, विराज पाटील, राजू यादव, हर्षल पाटील, विकी मोहिते, रुपेश रोडे, राजू जाधव, दीपक गौड, शुभांगी साळुंखे, दिपाली शिंदे, महादेव कुकडे, अरुण अब्दागिरी, दिनेश परमार, विनोद खोत, सुमित मेळवंती, कनिष्क शिंदे, प्रिया माने, सनराज शिंदे, रमेश वरुटे, अक्षय मोरे, ईनायत लतिफ, महेश साळोखे आदी सहभागी झाले होते.