...पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस होणार नाही : अमित ठाकरेंचा नीट परीक्षावरून संताप

<p>...पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस होणार नाही : अमित ठाकरेंचा नीट परीक्षावरून संताप</p>

मुंबई – नीट परीक्षेतील पेपर फुटीनंतर नीट परीक्षा रद्द करण्यात आल्याने अनेक विद्यार्थांना  नैराश्याचा सामना करावा लागत आहे यामध्ये काहींनी आत्महत्या करून आपला जीव संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी, ‘या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर आणि दलालांवर कठोर कारवाई झाली पाहिजे की, पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस होणार नाही’, असा संताप ट्वीट करून व्यक्त केला आहे.

अमित ठाकरे यांनी म्हटले आहे कि, "वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून, दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचा, आई-वडिलांनी शेतजमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहेरबानीमुळे पेपर फुटतो? आणि त्यावर उपाय काय तर परीक्षा रद्द? यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे सरकार?"

"या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात, तेव्हा खरंच लाज वाटते. सीबीआय तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. लातूरचे मूळ रहिवासी असलेले आणि चक्क एनटीएच्या पेपर सेटिंग पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात आपल्या राहत्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली त्यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यवधी रुपयांना विकली. पुण्यातून सुरू झालेलं हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर ते थेट हरियाणामधील गुरुग्रामपर्यंत पसरलं आहे. १५ ते २० लाखांना एक-एक पेपर विकला गेला. म्हणजेच, ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि जो प्रामाणिकपणे ६५० गुण मिळवण्याची क्षमता ठेवतो, त्याने आत्महत्येचा मार्ग निवडायचा?"

"या शिक्षण माफियांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची हिम्मत नाही का या सरकारमध्ये? केवळ परीक्षा रद्द करून आणि नवीन तारीख देऊन विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होत नसतो. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या पालकांचा आक्रोश वाया जाणार नाही. ज्या शिक्षण संस्थांनी आणि प्राध्यापकांनी या पवित्र क्षेत्राला कलंकित केलंय, त्यांच्या संपत्तीवर टाच आणली पाहिजे, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.