गोकुळची लढाई महायुती विरुद्ध जिल्ह्यातील दुध उत्पादक अशीच लढणार–आमदार सतेज पाटील
गोकुळ वाचविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या - आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : गोकुळ ही कोणत्याही राजकीय पक्षाची नव्हे, तर दूध उत्पादकांची संस्था असून ती वाचविण्यासाठी सर्वांनी गावपातळीवरील राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजिंक्यतारा कार्यालय येथे आयोजित ठरावधारकांच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराचा आढावा घेत विरोधकांवर जोरदार टीका केली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासात राजर्षी शाहू महाराजांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून राधानगरी धरण उभे राहिले. त्यामुळे शेतीला पाणी मिळाले, उत्पादन वाढले. त्यानंतर औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि स्वर्गीय आनंदराव चुयेकर यांच्या प्रयत्नांतून गोकुळ दूध संघाची स्थापना झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात गोकुळने मोलाची भूमिका बजावली. "उसाचा पैसा खर्चासाठी उपयोगी पडतो, पण दुधाचा पैसा शिल्लक राहतो. त्यामुळे शेतकरी स्वाभिमानाने उभा राहिला," असे त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांतील गोकुळच्या कामकाजाचा उल्लेख करताना त्यांनी दूध दरात मोठी वाढ केल्याचा दावा केला. मुंबईमध्ये जागा घेऊन आधुनिक पॅकिंग प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याचे कर्ज अवघ्या तीन वर्षांत फेडण्यात आले. सौरऊर्जा प्रकल्प उभारून संस्थेला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून दिला असून त्यातून दरवर्षी चार ते पाच कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लंपी आजाराच्या काळात म्हशींच्या लसीकरणासाठी गोकुळने मोठ्या प्रमाणावर काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवरही निशाणा साधला. "गोकुळची लढाई महायुती विरुद्ध जिल्ह्यातील दुध उत्पादक राहणार आहे. ही लढाई कोणत्या पक्षाविरुद्ध नसून दूध उत्पादकांच्या अस्तित्वासाठी आहे. गोकुळ संस्था टिकली तरच दूध उत्पादक टिकतील. त्यामुळे संस्था वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे," असे ते म्हणाले.
अजून निवडणुकीचे पॅनेल जाहीर झालेले नसतानाच महायुतीत भांडणं सुरु आहेत. दुध उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे आणि कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गावातील स्थानिक राजकारण काहीही असले, तरी गोकुळच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावे. जो कष्ट करतो, त्या दूध उत्पादकांची सत्ता गोकुळमध्ये आणायची आहे. संस्था वाचली तरच आपण सर्व वाचणार आहोत. यापुढेही शेतकरी आणि दूध उत्पादकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार, असे सांगत त्यांनी ठरावधारकांना एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले.
गोकुळ निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची टीम खालीपर्यंत राबत आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. आता सर्व दुध उत्पादकांचा आमदार सतेज पाटील यांच्यावर विश्वास असून ते पाठीशी राहतील, असा विश्वास माजी जिल्हापरिषद सदस्य जीवन पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी सचिन घोरपडे यांनी, सध्याची परिस्थिती पाहता गोकुळ दूध संघाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांच्या हाती द्यावे, अशी जिल्ह्यातील बहुतांश दूध उत्पादक व ठरावधारकांची भावना असल्याचे सांगितले. गोकुळसारखी संस्था सक्षम नेतृत्वाखाली राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी, "गोकुळ ही कोल्हापूरच्या मातीतून उभी राहिलेली संस्था आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता गोकुळच्या हितासाठी लढणाऱ्या बंटी पाटील यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे," असे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घोरपडे, शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, एस एम पाटील, एन के देसाई, भुजंगराव मगदूम, बाबासो देसाई,दिलीप केणे, सागर देसाई, अमर बरकाळे, अमोल पाटील, ऋषिकेश पाटील, नेताजी आरडे, विश्वजीत हापे, जयवंत पाटील यांच्यासह ठरावधारक उपस्थित होते.