नामदार हसन मुश्रीफ गटाकडून शक्तीप्रदर्शन करत गोकुळसाठी ठराव दाखल...
ना. हसन मुश्रीफ सहायक निबंधकांसह गोकुळच्या प्रशासकीय मंडळावर संतापले
कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध संस्थांकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या या संघाच्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच पक्षीय रंग मिळू लागला आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गोकुळची यावेळची निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे सांगणारे नामदार हसन मुश्रीफ वारंवार सांगत आहेत. पण महायुतीमधील जागा वाटप कसे असणार याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. यावर नामदार हसन मुश्रीफांनी ज्यांचे जास्त ठराव त्यांना जास्त जागा असे सूत्र लावले जाईल असे सांगितले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी, मागील निवडणूक राष्ट्रवादीने काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्यशक्ती पक्षासह एकत्र येत लढवली होती. गेल्या पाच वर्षांत पस्तीस वर्षांत जे शक्य झाले नाही ते आपल्या संचालक मंडळाने करुन दाखवले असल्याचे सांगितले.
आज ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी गोंधळ उडाला. ठरावधारकांसोबत समर्थकांनी कार्यालय परिसरात प्रवेश केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे नामदार हसन मुश्रीफांनी सहायक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांना धारेवर धरले. तसेच गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रशासनाच्या कामकाजाबाबत जाब विचारला. या गोंधळाला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करत मुद्दामहून अडथळे निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही नामदार मुश्रीफ यांनी केला.
आजच्या शक्तीप्रदर्शनावेळी माजी आमदार राजेश पाटील, के. पी. पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्यासह जिल्ह्यातील ठरावधारक आणि समर्थक उपस्थित होते.