राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत आ. सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न
वनक्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड, वनमंत्र्यांची कबुली
मुंबई - राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत बेकायदेशीररित्या वृक्षतोड करण्यात आल्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.
राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत गेल्या पाच वर्षात सुमारे साडेतीन लाखांहून अधिक वृक्ष बेकायदेशीरपणे तोडण्यात आले आहे. त्यात जवळपास ३८ टक्के म्हणजे सुमारे १ लाख २४ हजाराहून अधिक सागवानी झाडांचा समावेश आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे राज्याच्या वनसंपत्तीचे ३० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
या वृक्षतोडीची चौकशी करून संबंधित दोषी वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोणती प्रशासकीय किंवा दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच वाढत्या लाकूड तस्करीला आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी, राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत बेकायदेशीररित्या झालेल्या वृक्षतोडीची कबुली दिली. या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे राज्याच्या वनसंपत्तीचे ३० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले असले तरी एकूण पकडण्यात आलेल्या मालामुळे झालेली वसूली रुपये ३० कोटी १४ लाख रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले. अवैध वृक्षतोड प्रकरणी राज्यातील ४ वनक्षेत्रपाल, १२ वनपाल आणि १६ वनरक्षक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.