आलिशान कारमधून आले... अवघ्या दहा मिनिटांत १४ तोळे सोन्यावर डल्ला

राजेंद्रनगरातील सांची अपार्टमेंटमध्ये धाडसी घरफोडी; सीसीटीव्हीत कैद झाल्या चोरट्यांच्या हालचाली

<p>आलिशान कारमधून आले... अवघ्या दहा मिनिटांत १४ तोळे सोन्यावर डल्ला</p>

कोल्हापूर : आलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी राजेंद्रनगर परिसरातील सांची अपार्टमेंटमधील बंद घराचा कडी-कोयंडा तोडत अवघ्या आठ ते दहा मिनिटांत तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे चोरीची संपूर्ण घटना अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. त्या आधारे राजारामपुरी पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर येथील सांची अपार्टमेंटमध्ये राहणारे वैभव देवकर हे बुधवारी सायंकाळी कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर गेले होते. घर बंद असल्याची खात्री करून आधीपासून पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी आलिशान कारमधून अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी अत्यंत सराईतपणे घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. संपूर्ण चोरी अवघ्या आठ ते दहा मिनिटांत उरकून चोरटे त्याच कारमधून पसार झाले. या घरफोडीतील सर्व हालचाली अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. चोरट्यांनी वापरलेली कार, त्यांची ये-जा आणि चोरीची पद्धत याचा तपशील पोलिसांच्या हाती लागला असून त्यावरून संशयितांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी श्वेता देवकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.