कोल्हापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना तात्काळ पदावरून हटविण्याची जोरदार मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट असे दोन स्वतंत्र गट राज्यात निर्माण झाले. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रसिद्ध उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना योग्य मानसन्मान दिला नसल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली.
आढावा बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी अपेक्षित काम झाले नसल्याचे सांगितले. तसेच जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्ष विस्तार, कार्यकर्त्यांशी संवाद आणि संघटनात्मक बांधणी याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही करण्यात आला. यामुळे व्ही. बी. पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अथवा पक्षश्रेष्ठींनी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली.