अवनिचा 'अरुणोदय पुरस्कार' ज्येष्ठ समाजसेविका डॉ. प्रमिला जरग यांना प्रदान

<p>अवनिचा 'अरुणोदय पुरस्कार' ज्येष्ठ समाजसेविका डॉ. प्रमिला जरग यांना प्रदान</p>

कोल्हापूर - अरुण गांधी आणि अरुण चव्हाण यांच्या कार्याची आठवण रहावी म्हणून अवनि संस्थेच्यावतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला मानाचा 'अरुणोदय पुरस्कार' दिला जातो. यंदाचा पाचवा पुरस्कार 'अरुणोदय पुरस्कार' ज्येष्ठ समाजसेविका डॉ. प्रमिला जरग यांना देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

 या पुरस्काराने डॉ. प्रमिला जरग यांच्या महिला सक्षमीकरण, बालकल्याण, दत्तक प्रक्रिया, पुनर्वसन, साहित्य आणि प्रबोधन क्षेत्रातील डॉ. प्रमिला जरग यांच्या बहुआयामी कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे मानद सचिव जयसिंग कदम यांनी प्रास्ताविक केले.

पुरस्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. प्रमिला जरग यांनी, आपल्या आई- वडिलांनी दिलेले संस्कार, संघर्षमय बालपण आणि समाजसेवेची प्रेरणा याबाबत माहिती दिली. गरीब, निराधार आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर काम करण्याची प्रेरणा आपल्या कुटुंबातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, भूमिअभिलेख उपअधीक्षक किरण माने आणि डॉ. मंजिरी मोरे-देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अवनि संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव जयसिंग कदम, अर्चना जगतकर, डॉक्टर भारती पाटील, अतुल देसाई, जैनुद्दीन पन्हाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.