पेपरफुटीनंतर केंद्र सरकार देशातील परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत...
नवी दिल्ली - देशात नीट परीक्षेत झालेल्या पेपर फुटीमुळे २२ लाख विद्यार्थांचे भविष्य टांगणीला लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थांमध्ये मोठा रोष आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशातील परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘JEE’ आणि ‘NEET’ या परीक्षा एकत्र करून ‘एकच संयुक्त राष्ट्रीय प्रवेश परीक्षा’ घेण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. संसदीय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहेत.
केंद्र सरकारने इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) च्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात पदवी प्रवेशासाठी ‘एकच सामायिक परीक्षा’ घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. या नवीन रचनेनुसार, JEE आणि NEET या परीक्षा एकाच छताखाली आणल्या जातील. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाखेनुसार वेगवेगळ्या विषयांचे पर्याय असतील.