प्रशांत आंबी यांना धमकी सत्र सुरूच... पोलीस प्रशासन गांभीर्याने घेणार का ?

<p>प्रशांत आंबी यांना धमकी सत्र सुरूच... पोलीस प्रशासन गांभीर्याने घेणार का ?</p>

कोल्हापूर - ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे लिखित "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाचे कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना २२ एप्रिल रोजी सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर २४ एप्रिलला आमदार रोहित पवार यांनी कोल्हापुरात येऊन प्रशांत आंबी यांची भेट घेतली होती. त्याचदिवशी आमदार रोहित पवार, प्रशांत आंबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून राजारामपुरी पोलिसांत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. यासाठी ठाण मांडले होते. अखेर राजारामपुरी पोलिसांनी प्रशांत आंबी यांच्या फिर्यादीवरून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या घटनेला महिना उलटला असून अद्यापही अज्ञात व्यक्तींकडून प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि धमकी देणारे फोन अजूनही येत आहेत. त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासन हे प्रकरण गांभीर्याने घेणार का? असा सवाल प्रशांत आंबी यांनी उपस्थित केला आहे.

आंबी यांना फोनवरून धमकी देण्याचे सत्र अद्यापही सुरूच असल्याने, आंबी यांनी आता यापुढं न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान प्रशांत आंबी यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या आमदार संजय गायकवाड यांच्यावरील

अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयाकडे चौकशीसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पोलीस आता नोटीस पाठवून आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करणार आहेत.