राज्यात कायद्याची भीती राहिली नाही : नसरापूर घटनेवर आ. सतेज पाटील यांची संतप्त भावना
पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली आहे. त्या नराधमाला फाशी द्या, या मागणीसाठी काल रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह पुण्यातील नवले पुलावर आणला आणि पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास रोखून धरली. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावर विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची भीती राहिली नाही. खून करूनही सुटका होऊ शकते, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे. महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वाढत चालला आहे. गृहखात्याने कडक भूमिका घेऊन नराधमावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ. सतेज पाटील यांनी केली आहे.