फालेवाडा येथे तरुणाचा निर्घृण खून...

<p>फालेवाडा येथे तरुणाचा निर्घृण खून...</p>

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील कोनोली तर्फ असंडोली पैकी फालेवाडा (धनगरवाडा) येथे एका तरुणाचा निर्दयीपणे खून करण्यात आला. सुरज पांडुरंग फाले (वय 35, सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांची सोबती सानिया तानाजी पाटील (वय 30) गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज फाले हे दुपारी सुमारे तीनच्या सुमारास मैत्रिणीसह कोल्हापूरहून आपल्या मूळ गावी फालेवाडा येथे आले होते. त्याचवेळी काही संशयित आरोपीही गावात आले होते. यावेळी जुन्या वादातून दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. घरासमोरील शेतात झालेल्या या मारामारीत सुरज फाले यांच्या मानेवर धारदार शस्त्राने खोलवर वार करण्यात आला, तसेच डोक्यावर जबरदस्त प्रहार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेदरम्यान मैत्रीण सानिया यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही डोक्यात गंभीर मार बसून त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनास्थळी अत्यंत भीषण परिस्थिती पाहायला मिळाली. मानेवर कोयत्याचे खोल वार झाल्याने रक्ताचे थारोळे साचले होते, तर डोक्यावरच्या प्रहारामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या. तसेच घटनास्थळी उभी असलेल्या MH 10 BM 1322 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. या वाहनात एक बंदूक आणि दारूच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या आहेत.

या प्रकरणातील संशयित आरोपी धोंडीराम बापू फाले, दगडू बापू फाले आणि बाबू ज्ञानू फाले हे स्वतःहून राधानगरी पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. मात्र, या गुन्ह्यात आणखी किती आरोपी सहभागी होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे.