सह्याद्री व्याघ्र राखीव, चांदोली राष्ट्रीय उद्यानात ‘निसर्गानुभव’ कार्यक्रम उत्साहात; वन्यजीवांचे दर्शन, २५ निसर्गप्रेमींचा सहभाग

<p>सह्याद्री व्याघ्र राखीव, चांदोली राष्ट्रीय उद्यानात ‘निसर्गानुभव’ कार्यक्रम उत्साहात; वन्यजीवांचे दर्शन, २५ निसर्गप्रेमींचा सहभाग</p>

सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या आंबा वनपरिक्षेत्रामध्ये बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला “निसर्गानुभव कार्यक्रम” उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमांतर्गत वनपरिक्षेत्रामध्ये एकूण 15 पाणवठ्यांवर मचाणांची उभारणी करण्यात आली होती. या मचाणांवरून वन्यप्राण्यांचे निरीक्षण व नोंद घेण्याचे कार्य करण्यात आले. या कार्यक्रमात बाहेरील 25 निसर्गप्रेमी व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वन्यजीव संवर्धनासाठी आपला मोलाचा वाटा उचलला.

या निसर्गानुभव उपक्रमादरम्यान सहभागी व्यक्तींना वन्यजीवांचे अत्यंत जवळून आणि संस्मरणीय असे अनुभव घेता आले. रात्रीच्या शांत वातावरणात विविध पाणवठ्यांवर बसून निरीक्षण करत असताना अस्वल, बिबट्या, रानगवे, सांबर, भेकर, साळींदर, ससा, रानकोंबडी यांसारख्या अनेक वन्यप्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. काही प्राणी पाण्यासाठी येताना स्पष्टपणे दिसून आले, तर काहींची हालचाल व उपस्थिती त्यांच्या आवाजांवरून जाणवली. ठिकठिकाणी सेनापती व सुभेदार वाघांचे पायाचे ठसेही आढळून आले.

विशेषतः रात्रीच्या वेळेस जंगलातील नैसर्गिक ध्वनी, प्राण्यांचे हालचालीचे आवाज तसेच त्यांच्या हाका यामुळे संपूर्ण परिसर जिवंत झाल्याचा अनुभव सहभागी नागरिकांनी घेतला. या अनुभवामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासातील वर्तन, त्यांच्या हालचालींची पद्धत आणि पर्यावरणाशी असलेले त्यांचे नाते अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत झाली. संपूर्ण रात्रभर चाललेल्या या गणना प्रक्रियेत विविध वन्यप्राण्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली असून, या उपक्रमामुळे वन्यजीवांच्या हालचाली, त्यांच्या संख्येचा अंदाज व अधिवासाची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

वन्यजीव विभागाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला. सहभागी नागरिकांनीही वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता दाखवत सहकार्य केले. कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व निसर्गप्रेमींना सह्याद्री व्याघ्र राखीव तर्फे टी-शर्ट, कॅप प्रदान करण्यात आले. तसेच त्यांच्या सोयीसाठी सकाळचे जेवण, रात्रीचा पॅक लंच आणि दुसऱ्या दिवशी नाश्ता व चहापाणी याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

“चला प्राणी गणना करू, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी हातभार लावू” हा संदेश देत हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, अशा उपक्रमांमुळे वन्यजीव संवर्धनासाठी लोकसहभाग वाढण्यास निश्चितच चालना मिळणार आहे, असं आंबाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांनी सांगितलं.