आमदार सतेज पाटील स्वतः SIR मोहिमेसाठी घरोघरी; एसआयआर साठी जनजागृती करणारे राज्यातील पहिले लोकप्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर : निवडणूक आयोगाच्या विशेष पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जनतेसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय सहभागाचं आवाहन केलंय. आज त्यांनी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) नितीन शंकर सिसाळ यांच्यासोबत कसबा बावडा परिसरातील यशवंत कॉलनी, अजिंक्यतारा कॉलनी, पंचरत्न कॉलनी व मातंग वसाहत परिसरात घरोघरी भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या मतदारांचं मॅपिंग झालेलं नाही, अशा मतदारांशी संवाद साधत माहितीची पडताळणी केली.
SIR मोहिमेबाबत काही आक्षेप असले तरी प्रक्रिया सुरू झाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्ष राहून आपआपल्या बूथमधील मतदारांचं मॅपिंग पूर्ण करावे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करावेत, असं त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय.
जनजागृतीसाठी कॉंग्रेसकडून QR कोड व मोबाईल नंबर -
SIR मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, डुप्लिकेट नावे वगळणे आणि नव्या मतदारांची नोंद करणे यावर भर दिला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३३,६७,६५९ मतदारांपैकी सुमारे २४,५२,४१७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित सुमारे २७ टक्के मतदारांचे मॅपिंग बाकी आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे घरोघरी जावून जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून QR कोड व ९६७२५९९९९० या मोबाईलवर मिस्ड कॉल सुविधेद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय.
घरोघरी जाऊन SIR मोहिम राबविणारे आमदार सतेज पाटील पहिले लोकप्रतिनिधी -
राज्यातील लोकप्रतिनिधींमध्ये स्वतः घरोघरी जाऊन SIR मोहिम राबविणारे आमदार सतेज पाटील हे पहिले लोकप्रतिनिधी ठरत असून, मतदार जनजागृतीसाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. नागरिकांनी BLO कडे आवश्यक कागदपत्रे सादर करून आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा आणि या मोहिमेकडे दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही SIR मोहिमेत सक्रिय सहभाग घेतलाय.
यावेळी नगरसेवक सचिन चौगले, सुभाष बुचडे, अजित पोवार, निलेश नरुटे , सागर यवलुजे, पवन साळुंखे, युवराज उलपे, राहुल आळवेकर यांच्यासह भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.