सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव; मलकापूरमध्ये खळबळ

<p>सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव; मलकापूरमध्ये खळबळ</p>

कोल्हापूर - शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे किरकोळ कारणावरून सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला तात्काळ अटक केली आहे.

शनिवारी २ मे रोजी सकाळी नरेंद्र सिदार (मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. मलकापूर) हा मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शाहुवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात नरेंद्र याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, नरेंद्र व त्याचा भाऊ धिरेंद्र सिदार हे दोघे कामानिमित्त मलकापूर येथे वास्तव्यास होते. १ मे रोजी रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर धिरेंद्र हा बेपत्ता झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तत्काळ शोधमोहीम राबवून धिरेंद्र सिदार (वय ३२, रा. भोकलोडी, ता. पिठोरा, जि. महासमुंद, छत्तीसगड) याला मलकापूर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भांडणाच्या रागातून लोखंडी पट्टीने मारहाण करून भावाचा खून केल्याची कबुली दिली.

या प्रकरणी शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.