नसरापूर अत्याचार प्रकरण : फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस करणार : बालहक्क संरक्षण आयोग
पुणे - पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली आहे. त्या नराधमाला फाशी द्या, या मागणीसाठी काल रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह पुण्यातील नवले पुलावर आणला आणि पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास रोखून धरला. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या खळबळजनक घटनेची नोंद अखेर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
ॲड.संजय पुराणिक म्हणाले की, नसरापूर येथील छोट्या बालिकेसंदर्भात झालेली घटना दुदैवी आणि संतापजनक आहे. कायद्याच्या चौकटीत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी तसेच बालिकेच्या कुटुंबियांना शासनाकडून सहकार्य केले जाईल यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग राज्य शासनाला शिफारस करणार आहे. नागरिकांचा राग आणि संताप आम्ही समजू शकतो. मात्र, आम्ही नागरिकांना शांततेचे आवाहन करत आहोत.
आम्ही आयोगाच्यावतीने या बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकील शासनाने नियुक्त करावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.