इचलकरंजीत पगार रखडल्याने घंटागाडी बंद ; चौकाचौकात कचऱ्याचे ढीग, नागरिक त्रस्त

<p>इचलकरंजीत पगार रखडल्याने घंटागाडी बंद ; चौकाचौकात कचऱ्याचे ढीग, नागरिक त्रस्त</p>

इचलकरंजी - महानगरपालिकेच्या घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी सेवेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. मक्तेदाराकडून कामगारांचे वेतन वेळेवर न दिल्याने संतप्त कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी शहरातील अनेक भागांत कचरा उचलला न गेल्याने चौकाचौकात कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मक्तेदारांकडून वारंवार पगार रखडत असल्याने अशी आंदोलने  होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कामगारांनी घंटागाड्या रस्त्यावरच उभ्या केल्याने शहरातील अनेक भागांत कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी रस्ते, चौक आणि गल्लीबोळांमध्ये कचऱ्याचे ढीग साचू लागले असून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकदा आंदोलन करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने यावेळी पगार मिळाल्याशिवाय कामावर परतणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, मक्तेदार आणि महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांचे  रखडलेल वेतन अदा करावे,  तसेच शहरातील कचरा संकलन सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.