व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; करवीर पोलिसांची कारवाई

<p>व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; करवीर पोलिसांची कारवाई</p>

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध वेश्याव्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच गुन्हे शोध पथकाला तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत करवीर पोलिसांना माहिती मिळाली की, वाशी गावाच्या हद्दीतील सनराईज लॉजिंगमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असून, लॉजचालक पुणे व मुंबई येथून महिलांना आणून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे फोटो ग्राहकांना पाठवत होता. या ग्रुपद्वारे कोल्हापूरातील पांढरपेशा व्यक्तींना आकर्षित करून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे करवीर पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून ११ जुलै २०२६ रोजी सनराईज लॉजिंगवर छापा टाकला. कारवाईदरम्यान सागर प्रभाकर कांबळे (वय ४०, रा. मिनचे बुद्रुक, ता. भुदरगड) आणि कमलेश कृष्णा पाटील (वय ३५, रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) हे मिळून आले. चौकशीत लॉजचालक शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील (रा. हेदवडे, ता. भुदरगड) तसेच त्याचे सहकारी सुहास निचीते (रा. सोळांकूर, ता. राधानगरी) आणि विक्रम दिनकर कांबळे (रा. कासारवाडा, ता. राधानगरी) हे घटनास्थळी नसल्याचे आढळून आले.

कारवाईत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. तसेच ६,९०० रुपयांची रोख रक्कम, चार मोबाईल फोन, निरोधाचे एक पाकीट, ७२ निरोधांचे बॉक्स, रजिस्टर, भाडेकरारासह इतर साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी सागर प्रभाकर कांबळे याच्याकडे चौकशी केली असता, शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याने "सागर पाटील फ्रेंड सर्कल" नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून सदस्यांशी संपर्क साधला होता. सुहास निचीते आणि विक्रम दिनकर कांबळे यांच्या मदतीने ग्राहकांना सनराईज लॉजमध्ये बोलावून त्यांच्याकडून रोख अथवा ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारून हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय तळसकर, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल बेगम गडकरी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अमृता सोनुले, पोलीस पोलीस कॉन्स्टेबल अविनाश कांबळे यांच्या पथकाने पार पाडली.