शाळेसमोर चिखलाचे साम्राज्य ; संतप्त शिक्षक, विद्यार्थ्यांचे कागदी होडी आंदोलन
इचलकरंजी - महानगरपालिकेने जुना चंदूर रोडवरील न्यू व्हिजन विद्या मंदिर परिसरात ड्रेनेज पाइपलाईनसाठी खोदलेला रस्ता गेल्या महिनाभरापासून पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने संपूर्ण परिसर चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्याने व्यापला आहे. याठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण केवळ सुरुवातीला आणि शेवटी केले असून, शाळेसमोरील सर्वात महत्त्वाचा भाग मात्र तसाच सोडून दिला आहे. पावसामुळे याठिकाणी सर्वत्र चिखल झाला असून मोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या चिखलातून आणि साचलेल्या पाण्यातून रोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वचेचे आजार आणि पायाला इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांचा आधार घ्यावा लागत असून, अनेकदा घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
महापालिकेच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी अनोखे आंदोलन करत कागदी होड्या तयार करून शाळेसमोरील साचलेल्या पाण्यात सोडल्या. जशी ही कागदी होडी पाण्यात बुडते, तसाच महापालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे आमच्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्यही पावसाच्या पाण्यात बुडत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शाळेसमोरील रस्ता तात्काळ दुरुस्त करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.