मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर दरड कोसळली... या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन
मुंबई – राज्य सरकारकडून सातशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच या मिसिंग लिंकला गळतीही लागली आहे. सध्या दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
या मार्गावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु असल्याने नागरिकांनी मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईकडे जाताना उर्से टोल नाक्यावर सर्व वाहतूक रोखली आहे. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर असणाऱ्या फूडमॉलमध्येही पावसाचे पाणी साचले आहे.
त्यामुळे पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा, असे सांगण्यात येत आहे.