हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून कारवाई टाळा : आरटीओंचे आवाहन
कोल्हापूर - एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. डिसेंबर २०२४ पासून तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर याच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत ३० जूनला संपली आहे. मुदत संपल्यामुळे आज बुधवारपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून एचएसआरपी नसलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एक एप्रिल २०१९ पूर्वीची एकूण नऊ लाख पंधरा हजारांहून अधिक वाहने आहेत. यातील साडे चार लाखांहून अधिक वाहनधारकांनी आजअखेर एचएसआरपी बसवलीय तर उर्वरितांपैकी काहींनी ऑनलाईन नोंदणी करून अपॉईंटमेंट घेतल्या आहेत. अद्याप ज्या वाहनधारकांनी अपॉईंटमेंटसाठी नोंदणी केलेली नाही. त्यांनी तात्काळ नोंदणी करुन एचएसआरपी बसवून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.
एच.एस.आर.पी नसलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील महत्त्वाच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहनाचे हस्तांतरण, पत्ता बदणे, लोन क्लिअरन्स, वाहनांची पुनर्नोदणी अशा सेवांचा समावेश आहे. वाहनधारकांनी दंडात्मक कारवाईबरोबरच गैरसोय टाळण्यासाठी आपल्या वाहनांना एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.