बिल्डरचे अपहरण करून एक कोटीच्या खंडणीची मागणी ; पाच जणांवर गुन्हा
कोल्हापूर : शहरातील एका बिल्डरचे अपहरण करून तब्बल एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत बांधकाम बंद पाडल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पाच जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोरे माने नगर येथील 'सोनी हाइट्स' प्रकल्पाचे बिल्डर निलेश सुरेश जाधव (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी अजित भगवान तिवडे, फय्याज इसाक नगराजी, लखन बाळासाहेब माने, संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई, लाला शेट व इतरांनी संगनमताने फिर्यादीकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
तक्रारीनुसार, २९ एप्रिल रोजी फिर्यादीला जबरदस्तीने गाडीत बसवून आरोपी अजित तिवडे याच्या रुईकर कॉलनीतील कार्यालयात नेण्यात आले. तेथे एका खोलीत डांबून ठेवत एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन त्यांची सुटका करण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानंतर ६ जून रोजी आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या भावाला दमदाटी केली. ८ जून रोजी पुन्हा बांधकामस्थळी येऊन फिर्यादी व त्यांच्या पत्नीकडे खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच कामगारांना शिवीगाळ करून "आमचा विषय मिटवल्याशिवाय काम सुरू करायचे नाही" अशी धमकी देत बांधकामाचे काम बंद पाडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अपहरण, खंडणी, बेकायदेशीर कैद, धमकी व इतर संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण लोंढे करत आहेत.