प्रलंबित मागण्यांसाठी इचलकरंजीतील पेन्शनधारकांचे अप्पर तहसीलदारांना निवेदन
इचलकरंजी – शहरात सुमारे ३८ ते ४० हजार पेन्शनधारक असून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनेक महिन्यांपासून पेन्शन मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप वृद्ध निराधार, दिव्यांग पेन्शनधारक संघटनेने केला आहे. पेन्शन मिळाली नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून मागील थकीत पेन्शन तातडीने वितरित करावी, वृद्ध, विधवा आणि परित्यक्त महिलांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपयांची वाढ करावी, पेन्शनसाठी उत्पन्नाची मर्यादा ५० हजार रुपये करावी, ऑनलाईन प्रक्रिया अधिक सुलभ करावी तसेच पेन्शनसाठीची वयोमर्यादा ६५ ऐवजी ६० वर्षे करावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन अप्पर तहसीलदार महेश खिल्लारे यांना सादर करण्यात आले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.
या प्रसंगी कॉम्रेड सदा मलाबादे, भाऊसो कसबे, उषा माळी, संजय टेके यासीन भुई, भरमा कांबळे, धनाजी जाधव आदि उपस्थित होते.