रस्ता नाही, विकास नाही.. सरवडेच्या काळुगडे वसाहतीची पंचवीस वर्षापासून फरफट...
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील २०० हून अधिक लोकवस्ती असलेल्या काळुगडे वसाहतीला आजही मुख्य रस्त्याची सुविधा नाही. नागरिकांना एका अरुंद बोळातून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात चिखलातून चालावे लागते. रस्त्याअभावी लहान मुले, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात न्यायचे असल्यास किंवा गर्भवती महिलेला तातडीने उपचारासाठी न्यावे लागल्यास डोलीचा आधार घ्यावा लागतो. घरफाळा, पाणीपट्टी आणि इतर सर्व कर नियमित भरूनही रस्त्यासारखी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांवर सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले आहेत, मात्र ही वसाहत आजही विकासापासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता तातडीने रस्ता उपलब्ध न झाल्यास आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच इतर सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महिलांनी संतप्त शब्दांत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारत, मतदानाच्या वेळी आश्वासने दिली जातात. मात्र निवडणुका संपल्या की आमच्या अस्तित्वाचाही विसर पडतो. रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठीही आंदोलन करावे लागत असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी ? असा सवाल उपस्थित केला.
मूलभूत सुविधेपासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी महिलांसह तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे धाव घेत मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत तहसीलदार देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन एकशिंगे, संजय काळुगडे, रामा काळुगडे, संजय सुतार, विठ्ठल मोरे, रंगराव वाईंगडे, रणजीत जठार, संदीप खोराटे, अमित खोराटे, रामचंद्र मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.