डॉ. संजय डी पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान
मुंबई – आज कृषी दिनाचे औचित्य साधत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते डॉक्टर संजय डी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉक्टर संजय डी पाटील यांनी सहपत्नीक पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कार सोहळ्यावेळी कृषिमंत्री दत्ता भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्णन विखे – पाटील उपस्थित होते.
कृषी विकासासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. डॉक्टर संजय डी पाटील यांनी आधुनिक शेती, फलोउत्पादन, पर्यावरण संवर्धन, शेतकरी मार्गदर्शन, कृषी उद्योजकता आणि ग्रामीण विकासाचा प्रभावी संगम घडवून अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. तळसंदे येथील माळावर त्यांनी वनराई फुलवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती, उत्पादन वाढ आणि मुल्यवर्धन याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाच्यावतीने त्यांना 2023 चा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.