राधानगरी अभयारण्यात वन्यप्राणी गणना उत्साहात ; स्वयंसेवकांनी घेतला जंगलाचा थरारक अनुभव
कोल्हापूर - १ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या गणनेत स्वयंसेवकांनी जंगलातील विविध ठिकाणी उभारलेल्या मचाणांवर रात्रभर थांबून वन्यप्राण्यांचे निरीक्षण केले.
प्राण्यांचे आवाज, त्यांच्या हालचाली आणि जंगलातील शांत वातावरणाचा थरारक अनुभव सहभागींना घेता आला. मचाणांपर्यंत पोहोचताना दाट जंगलातील आव्हानात्मक परिस्थितीत वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कशा प्रकारे काम करतात. याचीही प्रत्यक्ष अनुभूती स्वयंसेवकांना मिळाली. राधानगरी आणि दाजीपूर वनपरिक्षेत्रात आयोजित या उपक्रमासाठी स्वयंसेवकांना वाहन व्यवस्था, जेवण तसेच रात्री पॅक लंचची सोय करण्यात आली होती. वन विभागाच्या या नियोजनाबद्दल सहभागींनी समाधानाची भावना व्यक्त केली. प्रकल्प संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका भंवर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. वनपाल, वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही यात मोलाची भूमिका बजावली.
या उपक्रमामुळे जंगल आणि वन्यजीवांचे महत्त्व जवळून समजून घेण्याचा हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. वन्यप्राणी गणना उपक्रमात सहभागी स्वयंसेवकांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, अशा उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित झाली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात पार पडलेली ही वन्यप्राणी गणना पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देऊन गेली आहे.