करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची फेरविचाराची मागणी

<p>करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची फेरविचाराची मागणी</p>

करवीर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (नागपूर–गोवा) प्रकल्पाला करवीर तालुक्यातून तीव्र विरोध होत असून, या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

२८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या भेटीत आमदार नरके यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांच्या भावना मांडत सविस्तर निवेदन सादर केले. प्रस्तावित महामार्गामुळे केर्ली, केर्ले, पाडळी बुद्रुक, निटवडे, शिंदेवाडी, खुपीरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी व हसूर दुमाला या १८ गावांतील मोठ्या प्रमाणात सुपीक शेती जमीन अधिग्रहित होण्याची शक्यता आहे. या भागातील शेती ऊस, भाजीपाला, भात, सोयाबीन व केळी यांसारख्या नगदी पिकांवर आधारित असून, जमिनींचे तुकडे झाल्यास शेती करणे कठीण होईल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, महामार्गामुळे स्थानिक नाले, जलस्रोत आणि नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, अशी चिंता देखील व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, या प्रकल्पाविरोधात करवीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसभांद्वारे ठराव मंजूर करण्यात आले असून, शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यामुळे हा विषय केवळ प्रशासकीय न राहता जनभावनेशी निगडित असल्याचे आमदार नरके यांनी स्पष्ट केले.

विद्यमान राष्ट्रीय महामार्ग आणि पर्यायी मार्ग उपलब्ध असताना नवीन समांतर महामार्ग उभारण्याची गरज नसल्याचे सांगत, हा प्रकल्प करवीर मतदारसंघातून वळविण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विषय गांभीर्याने ऐकून घेत शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून सकारात्मक भूमिका घेत फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. करवीरमधील वाढता विरोध आणि आमदार नरके यांच्या पुढाकारामुळे आता शासन स्तरावर या प्रकल्पात बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.