मेफेटेरेमाईन सल्फेट या इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला अटक...
कोल्हापूर – शहरातील सदर बाजार परिसरात राहणारा स्वप्निल माने हा शरीरासाठी घातक असणारी मेफेटेरेमाईन सल्फेट या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा कारवाई केली. मात्र त्याठिकाणी स्वप्नील माने हा सापडला नाही. याच परिसरात राहणारा त्याचा कामगार विनायक माने याच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मेफेटेरेमाईन सल्फेट या इंजेक्शनचा साठा मिळून आला. पोलिसांनी माने याला अटक केली असून त्याच्या घरातून ५० हजार रुपयांचा इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. दरम्यान राजारामपुरी परिसरातील गावरान मिसळ नजीक पोलिसांनी दुसरी कारवाई करत उघड्यावर गांजाचे सेवन करणाऱ्या प्रजल देवगिरीकर याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.