एसटी महामंडळ मे पासून राबवणार ‘आपली बस, आपली सेवा’ अभियान 

<p>एसटी महामंडळ मे पासून राबवणार ‘आपली बस, आपली सेवा’ अभियान </p>

कोल्हापूर -  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ‘आपली बस, आपली सेवा’ हे नवीन अभियान राबवणार आहे.  एक मे पासून याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. बस ताफ्यात वाढ होऊनही प्रवासी संख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवणे आणि सेवेची गुणवत्ता उंचावणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत चालक आणि वाहक यांच्या भूमिकेत बदल करण्यात येणार आहे, त्यांच्याकडून अधिक जबाबदार आणि प्रवासी-अनुकूल वर्तनाची अपेक्षा ठेवण्यात आली आहे. बसची नियमित स्वच्छता, वेळेचे काटेकोर पालन, गणवेशातील नीटनेटकेपणा आणि शिस्त यावर विशेष भर देण्यात येणार आहे, अशी माहिती  विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर यांनी दिली.

या अभियानाचा भाग म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व आगार प्रमुखांना बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था त्वरीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. बसस्थानके स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. नव्या अभियानामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.