राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी : बागेश्वर बाबावर संभाजीराजे छत्रपती संतापले
कोल्हापूर – बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्व स्तरावर संताप व्यक्त होत आहे. यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केले पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी, अशी मागणी करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजे यांनी म्हटले आहे कि, “धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात, राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”